अकोला :अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगावात मुलाने आणि सुनेने मिळून आपल्याच बापाची हत्या करून त्याच्यावर डीझेल टाकून जाळले. विनोद मारोती चोपडे आणि शालू विनोद चोपडे अशी आरोपींची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गोरेगाव येथे एक इसम जळालेल्या परिस्थितीत मृतावस्थेत पडला असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला असता मृतदेहाच्या पार्श्वभागावर धारदार शस्त्राने हल्ला करून मग मृतदेह जाळून टाकल्याचे निर्शनात आले. यानंतर पोलिसांनी आपले तपास केला असता मृतक मारोती चोपडे यांचा मुलगा विनोद मारोती चोपडे याच्यावर संशय आला.
दरम्यान, पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता आपल्या पत्नीशी आपल्याच वडिलांचे अनैतिक संबंध असल्याने त्याचा राग मनात घेऊन मी व माझी पत्नी शालू विनोद चोपडे आम्ही दोघांनी मिळून वडील मारोती गोदाजी चोपडे यांची हत्या केल्याची कबुली दिली.यांनतर या दोन्ही आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांनी अटक केली आहे.