ठाणे : ठाण्यातील मॉलमधील हर हर महादेव चित्रपट बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आव्हाड यांनी ट्वीट केले आहे.
आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, आज दुपारी साधारण एक वाजता मला वर्तकनागर पोलिसांनी फोन केला. वर्तकनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला. नोटीस घेण्यासाठी माणूस पाठवितो. नाहीतर तुम्ही पोलीस ठाण्यात या, मी पोलीस ठाण्यात आधी येतो. नंतर मुंबईला जातो, असे त्यांनी सांगितलं. पण, पोलीस ठाण्यात गेल्यावर निकम यांनी मला गप्पांमध्ये रंगवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल, हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण मी जे केलेलं नाही. तो गुन्हा मी कबुल करणार नाही, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून केले आहे.