मुंबई: अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेल्यांसाठी इशारा आहे. बेजबाबदारपणामुळं तुम्ही नोकरी गमावू शकता. अलाहाबाद कोर्टानं एका प्रकरणावर सुनावणी करताना याबाबत निकाल दिला आहे. हायकोर्टात रेल्वेमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवणाऱ्या व्यक्तीविरोधात एक प्रकरण आलं होतं. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवणाऱ्या मुलानं आपलं कुटुंब आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांची जबाबदारी घेणे टाळले आहे, असं या याचिकेत म्हटलं होतं.
ज्या व्यक्तीला अनुकंपा तत्वावर रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळाली होती, त्याच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुधा शर्मासह कुटुंबातील अन्य सदस्यांनी ही याचिका केली होती. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली होती.
आपलं कुटुंब आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांची काळजी घेण्याच्या एका आश्वासनावर अनुकंपा तत्वावर ही नोकरी देण्यात आली होती. मात्र, त्या व्यक्तीनं आश्वासन पाळलं नाही. कुटुंबीयांची जबाबदारी घेणे टाळले. याच कुटुंबात एक वृद्ध व्यक्तीही आहे, असं याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणावर निकाल देताना, ज्या व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली आहे, त्याने जर आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ केला नाही तर त्याची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते, अशी टिप्पणी त्यांनी केली. या प्रकरणात पुढील तीन महिन्यांत योग्य तो निर्णय घ्या, असा आदेशही रेल्वेला दिला आहे. (सौ. साम)