मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांना काल पीएमएलए कोर्टाने जामीन दिला. या सुटकेनंतर आज संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेतली.
या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहे, खासदार आहे, सामनाचे संपादक आहे, आणि माझे जीवलग मित्रही आहे., ‘मित्र तोच असतो, जो संकटाच्या काळामध्ये न डगमगता लढत असतो, साथ देतो तसे माझे राऊत मित्र आहे. काल जो न्यायदेवतेने निकाल दिला आहे त्याचे मी आभार मानतो. पण या निकालपत्रात न्यायालयाने काही परखड निरीक्षणे सुद्धा नोंदवली आहे. त्यामुळे हे जगजाहीर झाले की केंद्रीय यंत्रणा या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहे’.
‘भाजपने आजवर केंद्रीय यंत्रणेचा दुरूपयोग देऊन अनेक पक्ष फोडले आहे, अजूनही काही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अनेक खोट्या केसेस केल्या जात आहे. अनेक नेत्यांना तुरूंगात टाकलं जात आहे. मात्र, काल न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिल्यानंतरही कदाचित कुठल्यातरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला (संजय राऊत) गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.