विरोधकांना घेरण्यासाठी शिंदे गटाची मोठी रणनीती : “सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी ‘याप्रकरणी’ माफी मागितली पाहिजे”
पुणे : एकनाथ शिंदे यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह मोठी बंडखोरी केली होती आणि भाजपचा हात धरला होता. पण भाजपसोबत जाण्यासाठी प्रत्येक आमदाराने 50 खोके (कोटी रुपये) घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच आरोपांवरुन विरोधकांना घेरण्यासाठी आता शिंदे गटाकडूनही रणनीती आखण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरण्यासाठी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आले. शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्त झाल्यानंतर लगेच विजय शिवतारे कामाला लागले आहेत.
विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना 50 खोक्यांच्या आरोपांप्रकरणी आरोप सिद्ध करण्याचे किंवा माफी मागण्याचं आवाहन केले आहे.
सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात उद्या 2500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकू, तसेच याबाबत उद्या त्यांना नोटीस पाठवली जाईल, असे शिवतारेंनी सांगितले.