मुंबईः खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांना बडतर्फ केल्याशिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी पक्षातर्फे घेण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली.

माहितीनुसार, मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. मंत्रीमंडळात असणार्या अशा जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातील संसदेत काम करणाऱ्या एका महिला खासदाराबाबत अशाप्रकारे बोलणे कितपत योग्य आहे? असा सवाल या पत्रातून विचारण्यात आला आहे.
दरम्यान, शिष्टमंडळात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींचा समावेश होता.