जळगाव: जळगावमधील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही मंत्रीपद मिळण्याची इच्छा यापूर्वी बोलून दाखवली होती. आताही किशोर पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.
आमदार किशोर पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच पाचोरा येथे आज भव्य रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याला आमदार किशोर पाटील उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मला मंत्री पण नको आहे, मी स्वतःलाच मुख्यमंत्री समजतो असे म्हणणारे आमदार किशोर पाटील यांनी आता स्वतः मंत्री पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, शिंदे गटाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. यावेळी मंत्री पद न मिळाल्याने किशोर पाटील व त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर बोलताना किशोर पाटील यांनी मात्र मी नाराज नसल्याचं सांगत आपण स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.