मुंबई: चारचाकी कारमधील सर्वप्रवाशांना आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२ सीट बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे. कारचालकाने तसेच सहप्रवाशांनी सीट बेल्टशिवाय प्रवास केल्यास मोटार वाहन कायदा 2019 च्या अंतर्गत 149 (b) नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या नियमाची अंमलबजावणी आजपासूनच सुरु झाली आहे. मात्र, मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना काहीसा दिलासा दिला आहे. आजपासून पुढचे १० दिवस म्हणजेच १० नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
सीट बेल्ट संदर्भातल्या कारवाईला मुंबई वाहतूक पोलिसांनी १० दिवसांची सूट दिली आहे. या १० दिवसांत वाहतूक पोलिस लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत, तसेच आजपासून सीट बेल्ट वापरण्यासाठी कडक शब्दात समज दिला जाणार आहे. त्यानंतर वाहतूक पोलिस ११ तारखेपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात करणार आहेत. चारचाकी गाडीत सर्व प्रवाश्यांनी सीटबेल्ट वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

दरम्यान, आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र आता पुढील १० दिवस वाहतूक पोलीस दंड न ठोठावता जनजागृती करणार आहेत.