मुंबई: आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मिटला आहे. खुद्द आमदार रवी राणा यांनी हा आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगत हा वाद संपल्याचं म्हटलं आहे. परंतु, राणा यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले शब्द मागे घेतले नाही किंवा हा वाद मिटल्याचे स्पष्टपणे सांगितले नाही.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यांनी प्रकरण चांगलं हाताळलं. त्यांचे आभार मानतो. पण माझ्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहे. आज संध्याकाळी पूर्णाला 6 वाजता कार्यकर्त्यांशी चर्चा करू. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. उद्या 12 ते 1 वाजता आमचा कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आहे. महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येणार आहेत. तेव्हाच आमची भूमिका स्पष्ट करू, असे बच्चू कडू म्हणाले.