मुंबई : मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव स्तरावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपसंचालक पदावर असलेल्या महिलेचा विनयभंग केला. ‘मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव, अशा प्रकारचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवांनी केलं आहे. त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले कि, 18 ऑक्टोबर 2022 च्या घटनेमध्ये महिला अधिकाऱ्यांनी स्वतःचा लेखी तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे दिलेला आहे.तसेच त्यांच्या सचिवांनादेखील दिलेला आहे. त्यांना त्यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझ्याकडे ही माहिती आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी मला सांगितलं आहे.
ही घटना घडल्यावर तातडीनं मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे सुद्धा त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. त्या ठिकाणी अनेक कार्यालयीन कामासाठी महिला येतात.मला असं वाटतं की,या दोघांना म्हणजे अवर सचिव आणि उपसचिव आहेत, त्यांना या कार्यातून तात्पुरते कार्यमुक्त केलं पाहिजे.यामध्ये स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी याबाबत चौकशी करावी.
सदर चौकशी करून या महिलेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या दोघांनाही तातडीनं त्यांच्या जबाबदारीतून बाजूला ठेवावं. नाहीतर चौकशी नि:पक्षपाती होणार नाही. अशा प्रकारची वक्तव्य जर मंत्रालयात होत असतील आणि याबाबत संभाजीनगरला 20ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाली होती. मात्र इतके दिवस होऊन सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नसेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. सरकारने या घटनेकडे तातडीनं लक्ष द्यावं.त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.(सौ. साम)