मुंबई : ‘महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहेत. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे, याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे’, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्रातील मोदी सरकार गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे. राज्यात सत्ताबदलानंतर आलेले शिंदे-फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पाठवत आहेत. एक दिवस हे सरकार मुंबईही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे.
‘राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे’, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.