मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यभरातून शिंदे-फडणवीस सरकार विरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे ती म्हणजे टाटा एअरबस हा प्रकल्प नागपूरमध्ये व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आग्रही होते. यासाठी त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना यांना एक पत्र देखील लिहीले होते अशी माहिती समोर आली आहे.
या पत्रात त्यांनी नागपूरात साकारण्याचा प्रस्ताव असणारा टाटा एअरबसचा प्रकल्प हा नागपूर परिसरात टाटा समुहाच्या विस्तारीत योजनांसाठी फायद्याचं ठरेल असं म्हटलं होतं. शिवाय नागपूर टाटा समुहाचं हब बनवण्याची विनंती देखील गडकरी यांनी टाटा कंपनीला केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आता खुद्द गडकरी या प्रकल्पासाठी आग्रही असताना देखील महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प गुजरातला का गेला याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.