पुणे: पुण्यात अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकलीवर ओळखीतल्या व्यक्तीनेच अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, वारजे माळवाडी परिसरात एक मजुरी करणारे दाम्पत्य वास्तव्यास आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या या दाम्पत्याला १३ महिन्यांची चिमुकली देखील आहे. या चिमुकलीच्या वडिलांच्या नराधम मित्रानेच हे कृत्य केले.चिमुकलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तुम्ही येईपर्यंत मी चिमुकलीचा सांभाळ करतो, तुम्ही बिनधास्त जा, असे म्हणत चिमुकलीला आपल्या कडेवर घेतले. मित्र असल्याने ते आपल्या बाळाचा सांभाळ करतील असे चिमुकलीच्या आई-वडिलांना वाटले. त्यामुळे ते दोघेही कामासाठी निघून गेले. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने दुपारच्यावेळी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, चिमुकलीचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना बाळ रडताना दिसले. बाळाचे रडणे काही थांबत नसल्याने त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.यानंतर आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.