बुलडाणा: बुलडाण्यातही दुष्काळग्रस्त भागाची नुकसान भरपाई न मिळाल्याने दिवाळीच्याच दिवशी शेकडो शेतकरी अर्धनग्न अवस्थेत विषाची बाटली हातात घेवून रस्त्यावर उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भातील अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या. ही मागणी करत दिवाळीच्या दिवशी सकाळी पहाटेपासून अर्धनग्न अवस्थेत विषाची बाटली हातात घेऊन शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे,असा आरोप प्रशांत डिक्कर यांनी सरकारवर केला आहे.
दरम्यान, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना विना अट १०० टक्के नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यावेळी प्रशांत डिक्कर यांनी सरकारकडे केली आहे.