तिरुवनंतपूरम: देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. परंतु, देशाच्या दक्षिण भारतातील केरळ राज्यात दिवाळी साजरी केली जात नाही. त्यामागे काही पौराणिक कारणं आहेत.
माहितीनुसार, केरळचा राजा आणि असूर महाबलीचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाला होता. केरळमध्ये असूर महाबलीची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, महाबलीचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाल्याने केरळमध्ये दिवाळी सण साजरा केला जात नाही, अशी एक मान्यता आहे. त्याशिवाय केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याची आणखीही काही कारणं आहेत.
केरळमध्ये दिवाळी साजरी न होण्यासाठीचं आणखी एक कारण म्हणजे तिथलं हवामान. उत्तर भारतात पावसाळा संपल्यावर हिवाळा सुरू होतो. हिवाळ्यात दिवाळी सण साजरा केला जातो. तर केरळमध्ये असं होत नाही. केरळमध्ये हिवाळ्याची सुरुवात होत नाही आणि पावसाळाही संपत नाही. पाऊस होत असल्याने केरळमध्ये ना दिवे लावले जात, ना फटाके फोडले जात. म्हणजेच पाऊस हे सुद्धा दिवाळी साजरी न करण्यामागचं कारण आहे.
तसेच, उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील हिंदूंच्या मान्यतेमध्येही फरक आहे. जसं की, उत्तर भारतात प्रभू रामचंद्राची पूजा करण्याची पद्धत आहे. पण केरळमध्ये तसं नाही. केरळमध्ये श्रीरामाऐवजी श्रीकृष्णाची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळेही उत्तर भारताप्रमाणे या ठिकाणी दिवाळीचा जल्लोष आणि उत्साह दिसून येत नाही.