मुंबई : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आयटम म्हणून हाक मारली म्हणून न्यायालयाने २५ वर्षीय आरोपी तरुणाला दीड वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एखाद्या मुलीला आयटम असे संबोधित करणे हे लैंगिक शोषणापेक्षा कमी नाही, असे निरीक्षण पोक्सो न्यायालयाने नोंदवले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, २०१५ मध्ये १६ वर्षीय पीडिता मुलगी शाळेतून घरी जात असताना वाटेत २५ वर्षीय एका व्यावयासिक तरुणाने तिची वाट अडवली. आरोपीने ‘क्या आइटम किधर जा रही हो’ असे म्हणत मुलीची छेड देखील काढली. तसेच, आरोपीने पीडित मुलीचे केसही ओढले. आरोपीच्या या कृत्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
या प्रकरणाची विशेष पोक्सो न्यायाधीश एस.जे. अन्सारी यांच्यासमोर सुनावणी झाली. व लैंगिक शोषणाच्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. महिलांसोबत होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी अशा रोडसाईड रोमियोंना धडा शिकवणे आवश्यक असल्याचे म्हणत न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास नकार देत दीड वर्षांची शिक्षा ठोठावली.