नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी ‘रोजगार मेळा’ सुरू केला. या रोजगार मेळाव्यात येत्या दीड वर्षात 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी दिली जाणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करताना पीएम मोदी म्हणाले, दहा लाख लोकांची भरती करण्यासाठी सुरू झालेला ‘रोजगार मेळा’ हा गेल्या आठ वर्षांतील रोजगार, स्वयंरोजगारासाठी सरकारच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी ऑफर लेटर देण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी जूनमध्ये केली होती. दीड वर्षात त्यांची मिशन मोडमध्ये भरती करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला सुरुवात करताना दिलेल्या भाषणातील 10 मुख्य मुद्दे जाणून घेऊया.

1. आज भारतातील युवा शक्तीसाठी एक महत्त्वाची संधी आहे. गेल्या आठ वर्षांत देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे. आज त्याचा रोजगार मेळाव्याच्या रूपाने आणखी एक टप्पा पार पडला आहे. आज केंद्र सरकार 75 हजार तरुणांना ऑफर लेटर देत आहे. मागील 8 वर्षात लाखो तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.
2. विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आपण स्वावलंबी भारताच्या वाटेवर चालत आहोत. यामध्ये आपले इनोव्हेटर्स, उद्योजक, शेतकरी, सेवा आणि उत्पादन क्षेत्राताली सहकारी यांचा मोठा वाटा आहे.
3. गेल्या 7-8 वर्षांच्या मेहनतीमुळे केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये इतकी क्षमता आली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रचंड निश्चयामुळे हे घडले आहे. येत्या काही महिन्यांत लाखो तरुणांना शासनाकडून ऑफर लेटर दिली जाणार आहेत.
4. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 7-8 वर्षात आम्ही 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे शक्य झाले आहे कारण, गेल्या 8 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणीवा निर्माण होत होत्या, त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत.
5. ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजने’अंतर्गत देशातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे. या अंतर्गत, स्किल इंडिया मोहिमेच्या मदतीने आतापर्यंत 1.25 कोटीहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
6. गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे आणखी एक उदाहरण म्हणजे आपले खादी आणि ग्रामोद्योग विभाग. देशात प्रथमच खादी आणि ग्रामोद्योगने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या वर्षांत खादी आणि ग्रामोद्योगात एक कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातही आमच्या भगिनींचा मोठा वाटा आहे.
7. स्टार्टअप इंडिया मोहिमेने देशातील तरुणांची क्षमता जगभरात पोहोचवली आहे. 2014 पर्यंत देशात केवळ काहीशे स्टार्टअप होते, आज ही संख्या 80 हजारांच्या पुढे गेली आहे.
8. भारत अनेक प्रकारे आत्मनिर्भर होत आहे. 21 व्या शतकातील देशाचे सर्वात महत्वाकांक्षी मिशन म्हणजे आत्मनिर्भर मिशन आहे. भारत आयातदाराकडून निर्यातदाराच्या भूमिकेत येत आहे. भारत अनेक क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
9. रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. आज वाहनांपासून ते मेट्रोचे डबे, रेल्वेचे डबे, संरक्षण उपकरणे अशा अनेक क्षेत्रांत निर्यात झपाट्याने वाढत आहे. हे घडत आहे कारण भारतात कारखाने वाढत आहेत आणि त्याच वेळी कामगारांची संख्याही वाढत आहे.
10. उत्पादन, पर्यटन क्षेत्रातून भरपूर रोजगार निर्माण होत आहेत. या क्षेत्रांच्या विस्तारावर सरकारचा भर आहे. कोविड महामारीदरम्यान, केंद्र सरकारने MSME क्षेत्राला 3 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत दिली, ज्यामुळे 1.5 कोटींहून अधिक नोकऱ्यांवरील संकट टळले. (सौ. साम)