जत : येथील सांगोला-जत राष्ट्रीय महामार्गावर सिद्धार्थ पॉलिटेक्निकल जवळ कंटेनरने दिलेल्या धडकेत अंगणवाडी सेविका कमलाक्षी दाजीबा घोडके (वय- ३९, रा. शेगाव) ठार झाली. सदरची ही घटना बुधवारी (दि. १९) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कमलाक्षी घोडके या घारगे वस्ती येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कमलाक्षी घोडके या शेगावहुन उमराणीकडे स्कुटीने निघाल्या असता जत-शेगाव रोडवरील सिद्धार्थ पॉलटेक्निकजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने कमलाक्षी घोडके यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर जखमी घोडके यांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.