आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी सांगली यांचा शासकीय मनाई आदेश असताना ही गायरान जमिनीची दिघंची च्या बाहेरील नागरिकांना तसेच धनदांडग्या लोकांना विक्री केली असल्याची तक्रार बहुजन समता पार्टीने सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत बहुजन समता पार्टीचे दिघंची गटप्रमुख शंकर जावीर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. दिघंची ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल मोर यांनी शासकीय गायरान जमिनीची धनदांडग्या लोकांना विक्री करून अनेकांची फसवणूक केली आहे.

त्या जागा बाहेरगावच्या पळसखेल, राजेवाडी, पुजारवाडी, उंबरगाव, लोकांना विकल्या आहेत. या संदर्भात पंचायत समिती आटपाडीला अनेक वेळा तक्रारी पुराव्यानिशी दिल्या आहेत. याबाबत पंचायत समितीने सविस्तर अहवाल करून सरपंचावर कारवाईचा अहवाल प्रस्तावित केला होतो.
काही काळासाठी शासकीय गायरान वरची विक्री थांबवली होती परंतु ग्रामपंचायतीची मुदत संपत आल्याने आसपासच्या गावातील लोकांना बाजारभावापेक्षा कमी दराने जागा देतो म्हणून विक्रीचा सपाटा लावला आहे. दिघंची गावातील शासकीय गायरानमध्ये भूमिहीन व गरिबांसाठी या गायरानचा वापर व्हावा परंतु गावाच्या बाहेरील लोकांना या जागेची विक्री करून फसवणूक चालु आहे. तरी सदर प्रकरणात लक्ष घालून हा सर्व प्रकार थांबवावा. अशी विनंती केली आहे.
निवेदनाच्या प्रती, उपजिल्हाधिकारी सांगली, तहसीलदार सो आटपाडी, पोलीस ठाणे आटपाडी, गटविकास अधिकारी आटपाडी यांना दिल्या आहेत.