पुणे : पुण्यात काल धुवाधार पाऊस पडला. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं. याबाबत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यातील समस्यांवर बोलतानाच त्यांनी मंत्र्यांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेचाही समाचार घेतला.
शिंदे सरकारला आता शंभर दिवस पूर्ण झालेत. नव्याचे नऊ दिवस असतात. पण लोकप्रतिनिधी कशीही भाषा वापरू लागले आहेत. अपण काय बोलतो याचं तारतम्य बाळगलं जात नाही. “आम्ही तुमचे नोकर आहोत का?, बाबाची पेंड आहे का?”, असं बोललं जातं. अशी भाषा लोकप्रतिनिधीनी वापरणं योग्य नाही, असे अजित पवार यांनी वक्तव्य केले.

तसेच, पुण्यात काल झालेल्या पावसावरही अजित बोलले. कालच्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झालंय. रस्त्यारस्त्यावर पाणी साचलं. दगडूशेठ मंदिरातही पाणी शिरलं. लोकांचे हाल झाले, अनेक धरणं भरल्याची माहिती आहे. जर या धरणांमधून पाणी सोडणार असतील तर नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जावा. लोकांना कल्पना देऊनच पाणी सोडलं जावं, असे अजित पवार म्हणाले.