जत: जत तालुक्यातील सिंदूर येथे मातेने आपल्या दोन मुलासह स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. लक्ष्मी धनेश माडग्याळ (वय 23), दिव्या धनेश माडग्याळ (दोन वर्ष) व नऊ महिन्याचा मुलगा श्रीशैल अशा तिघांचा मृत्यू झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मी धनेश माडग्याळ हिचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिचे भगवान येथील एका तरुणाशी विवाह ठरला होता मात्र तिला पसंत नसल्याने गावातीलच धनेश सिद्दनिंग माडग्याळ या युवकाबरोबर लग्न केले. धनेश माडग्याळ यांच्याबरोबर तिने पळून जाऊन लग्न केले होते. तिचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते परत गावी येऊन सिंदूर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आढळहाटी रोडवर स्वतःच्या शेतात राहत होते. तिला एक मुलगी व एक मुलगा आहे. प्रेम प्रकरणातून प्रकरण मिटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना धनेश माडग्याळ याने काही रक्कम दिली होती. या वादातून त्यांचे सारखे खटके व भांडण होत होते. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, आत्महत्या नंतर लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

दरम्यान, दोघांचे मृतदेह सांगोल्याच्या पथकाला बोलावून बाहेर काढण्यात आले. जत पोलीस ठाण्यात मात्र मयत नोंद झाली असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.