मुंबई: विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने येणार आहे. परंतु, त्याआधीच विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालयाला टाळे लावण्यात आले. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे.
तसेच, शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा आमचा असून दोन तृतीयांश आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. तर, शिवसेनेने बंडखोरांवर कारवाईसाठी पावले उचलली आहेत. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम विधीमंडळातील पक्षाच्या दालनावरही दिसून येत आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय यांनी कळविल्यामुळे दालन बंद ठेवण्यात आल्याची सूचना लावण्यात आली आहे. या पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, सरकार स्थापन झाल्यानंतर आज राज्यपालांच्या आदेशानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार असून त्यानंतर बहुमत चाचणी पार पडणार. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे.