नागपूर: नागपुरच्या हार्डवेयर व्यापाऱ्याचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी व्यापारात सोबत घेतलेल्या चुलत भावानेच व्यापाऱ्याचा गळा चिरून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपी चुलत भावाला जेरबंद केले. संदेश राजेंद्र क्षीरसागर (२४) रा. साईकृष्णा रेसिडेन्सी, पिपला हुडकेश्वर, नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृतक अनिकेश पंजाबराव क्षीरसागर (वय ४९) रा. उदयनगर नागपूर याची भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील लेंडेझरी जंगलातील नेरला ते इटगाव मार्गावर गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीसांनी घटनास्थळ दाखल होत तपास सुरु केला. अड्याळ येथील एका दुकानात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून अनिकेशचा चुलतभाऊ संदेश क्षीरसागर याच्याशी संपर्क साधला. तेव्हा तो एकटाच ब्रम्हपुरी येथे असल्याचे सांगितले. परंतु, त्याच्या संभाषणात संशय जाणवत असल्याचे लक्षात आल्याने त्यावरून पोलिसांनी त्याला नागपूर येथून ताब्यात घेतले. यावेळी त्याने गुन्हा कबूल केला.

दरम्यान, अनिकेश याला जंगलात जेवण करण्याची आवड होती. त्यामुळे कुठेही बाहेरगावी जायचे असल्यास तो सोबत डब्बा घ्यायचा. जंगलात चांगली जागा पाहून, त्या ठिकाणी जेवण करायचा. घटनेच्या दिवशीही तो आपला चुलत भाऊ संदेश सोबत कारने डब्बा घेऊन निघाला होता. इटगाव जंगलात रस्त्यावर कार उभी करून अनिकेश व संदेश दोघेही जेवायला बसले. डब्यातील तेलाचे डाग पुसण्यासाठी झाडाची पाने आणतो असे सांगून संदेश थोडा दूर गेला. काही वेळात त्याने आपल्या बॅगमधील शस्त्र काढून अनिकेशचा गळा चिरल्याचे कबुल केले.