सातारा – पश्चिम महाराष्ट्र हा पहिल्या पासून राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो राष्ट्रवादीनेते शरद पवार यांना या जिल्ह्याने भरभरून दिले आहे. परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकी आधी आ.शिवेंद्रराजे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने या किल्ल्याचे बुरुज ढासळण्यास सुरवात झाली.
तसेच, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांच्या उमेदवारीवरून भाजपवर मराठा समाज आणि छत्रपतींच्या गादीवर प्रेम करणारे कार्यकर्ते नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, शिवेंद्रराजेंचा राजकीय प्रवास पाहता सलग चार वेळा शिवेंद्रराजे हे जावळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. तीन वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर तर मागील निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर त्यांनी विजय संपादन केला आहे.

त्यामुळे भाजपला सातारा जिल्ह्यामध्ये सत्ता स्थाने मजबूत करायचे असतील तर आमदार शिवेंद्रराजन पुढे जाता येणार नाही शिवेंद्रराजेंना मंत्रीपद देऊन त्यांची ताकद वाढवली तर पर्यायाने पक्षाला सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठी ताकद मिळणार आहे.
दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजेंना मंत्री मंडळात स्थान देण्याचा शब्द देखील सातारकरांना दिल्याने आता भाजप छत्रपतींना दिलेला शब्द पाळून मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.