नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दरात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 1100 रुपयांनी वाढ झाली होती. आज म्हणजे शनिवारी सुद्धा सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोने 968 रुपयांनी महागले असून ते प्रति 10 ग्रॅम 51849 रुपयांवर पोहोचले आहे. एकीकडे सोन्याचे दर वाढले असले, तरी चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो 403 रुपयांनी घसरून 58 हजार 400 इतका झाला आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 51849 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50863 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी, सोन्याचे दर त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,351 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे.
दरम्यान, 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.