नवी दिल्ली : नोकरीच्या अमिष दाखवून बिहारमधील एका 30 वर्षीय महिलेला दिल्लीला बोलावण्यात आले. त्यानंतर तिला विमानात बसवून ओमानला पाठवण्यात आले. इतकंच नाही तर, तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचं तक्रार तिच्या पतीने पोलिसांत केली आहे. या प्रकरणात त्यानं दिल्ली पोलिसांना तक्रारही केली पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा त्यानं केला असून आता दिल्ली हायकोर्टात मदतीची याचिका दाखल केली आहे.

बेपत्ता झालेल्या महिलेच्या पतीने सांगितलं की, त्याची पत्नी गर्भवती आहे. त्याला आधीच तीन मुले आहेत यावर्षी 10 एप्रिल रोजी त्याच्या पत्नीच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला आणि त्याने तिला दिल्लीतील पहाडगंज येथील हॉटेलमध्ये नोकरीची ऑफर दिली. नोकरीची ऑफर मिळाल्यानंतर सदरील महिला 29 मे रोजी ट्रेनने दिल्लीला गेली. तिथे पोहोचल्यानंतर महिलेने तिच्या पतीला फोनही केला.
फोनवर तिने आपण असुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यानंतर महिलेचा फोन कव्हरेजच्या बाहेर गेला.दरम्यान, पुन्हा 8 जून रोजी महिलेनं आपल्या पतीला एक ऑडिओ मॅसेज केला. त्यामध्ये तिने आपण ओमानमध्ये असून 10 अन्य मुलींसोबत डांबून ठेवण्यात आल्याचं सांगितले. आपल्याला जनावरांसारखी वागणूक देत असल्याचंही पीडित महिलेनं नवऱ्याला सांगितले.
त्यानंतर पीडित महिलेच्या नवऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यावेळी त्याला दिल्लीचं प्रकरण असल्यानं दिल्लीत तक्रार करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार त्यानं दिल्लीच्या पहाडगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण त्यामध्ये कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोपी महिलेच्या पतीने केला. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे पीडित महिलेच्या पतीने कोर्टात धाव घेतली. दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करत त्याने आपल्या पत्नीला वेश्याव्यवसायात ढकलले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.