“स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते, मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या…”: एकनाथ शिंदेनी मानले फडणवीसांचे आभार!
मुंबई : एकनाथ शिंदे हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज, गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे यांना भाजपचे संपूर्ण समर्थन असेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असे फडणवीस यांनी सांगितले. ते आज संध्याकाळी एकटेच शपथ घेणार आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केले. भाजपकडे संख्याबळ आहे. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, असे विधान एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही जो निर्णय घेतला तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका घेवून पुढे जात आहे. बाळासाहेबांचा विचार तसेच राज्याचा विकास हा अजेंडा घेवून आम्ही निघालो आहोत. गेले काही दिवस आम्ही सर्व ५० आमदार एकत्र आहोत. राज्याच्या विकास आणि गेल्या अडीच वर्षात जे काही घडलं ते आपल्याला माहित आहे. फडणवीसांनीही याबाबत नुकतंच सांगितलं आहे.

मतदारसंघातील अडचणी विकासकामांबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार माहिती दिली आणि मागणी केली. मी देखील अनेकदा त्यांच्याकडे चर्चा केली. मात्र, अनैसर्गिक आघाडीबाबत आम्हा सर्व आमदारांमध्ये नाराजी होती. तसेच पुढच्या निवडणुकित येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून आम्हाला निर्णय घ्यावा लागला. राज्याच्या हिताच्या भविष्याच्या दृष्टीने सर्व काही घडत आहे. काल मंत्रीमंडळात काही निर्णय घेण्यात आले त्याचे आम्ही स्वागत करतो, पण हे निर्णय आपण पूर्वीच घ्यायला हवे होते. ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात त्याचं कारण, आत्मपरिक्षण करायची गरज होती, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार एकत्र येतात आणि त्यांनी मला समस्या सांगितल्या.
देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतला आहे, जवळपास १२० चं संख्य़ाबळ असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं असतं,पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबादिला, त्यांचे आभार मानतो. मी देखील कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती , पण जे काही घडलं आहे ते समोर आहे, जी जनेतेची अपेक्षा आहे ती पू्र्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, एकत्र काम करु, ते मंत्रीमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी ते आमच्या सोबत आहेत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, फडवीसांसारखी उदाहरणं फार दुर्मीळ आहे.
५० आमदारांमध्ये काही मंत्री आहेत, ते त्यांच्या मतदारसंघात ताकदवान नेते आहेत, माझ्यावर विश्वास ठेवणं हे कठीण आहे, पण त्यांनी जी वैचारिक लढाई लढली आहे, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सर्व आमदारांनी केलं आहे, त्यामुळे इतिहास घडला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. (सौ .साम)