मुंबई: एकनाथ शिंदे हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज, गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. ते आज संध्याकाळी एकटेच शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच भाजपच्या इतर नेत्यांनी आज, गुरुवारी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देणार असून, ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

तसेच, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी काम करत नाही. ही तत्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. विचारांची लढाई आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा भाजपने निर्णय घेतला आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.