मुंबई: बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आघाडी सरकार अडचणीत आले होते. यामुळे आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार स्थापन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसकडून भाजपवर आरोप सुरु आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले, बंडखोर केलेल्या १६ आमदारांना उपसभापतींनी दिलेली नोटीस जीवंत आहे. या नोटीसीला त्यांना ११ जुलैपर्यंत खुलासा द्यावाच लागणार आहे, तोपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होणार नाही, असे माझे मत आहे. औरंगाबादच्या नामांतरावर बोलताना वड्डेटीवार म्हणाले. सर्वधर्मसमभाव ही काँग्रेसची भूमिका आहे. नामकरण मुद्द्यांवर थोडीफार नाराजी आहे. नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांना मी समजावून सांगणार आहे. संभाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी आदरणीय आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांना मोठी खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. यात मंत्रीपद वाटपाचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.