मुंबई: उद्धव ठाकरेनी फेसबुक लाईव्ह न करता विधीमंडळात येऊन भूमिका मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनाना द्यायला हवा होता असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही असेही म्हणाले आहेत.
“सुप्रीम कोर्टाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. बरीच अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकांवर सुनावणी करु सांगू आणि आता आपलाच निर्णय बदलला. त्यांनी विचित्र निर्णय झाला आहे. ही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा नव्हती,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

“उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसेच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केले हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आले असते. एक-दोन तास सभागृह चालले असते आणि नंतर निर्णय घेतला असता तर चालले असते,” असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
“आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही. रक्तपात होईल वैगेरे असे जे काही ते म्हणाले ते खोटे होते. त्यांनी लढायला हवे होते, ” असेही ते म्हणाले. तसेच माझी नाराजी नसून वैयक्तिक मत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
“ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष पाठिंबा दिला त्यांना सांगायला हवे होते. फेसबुक लाईव्ह आणि विधीमंडळात बोलणे यात फरक आहे. विधीमंडळात जे बोलतो ते रेकॉर्डवर राहते,” असे यावेळी ते म्हणाले. (सौ.लोकसत्ता)