मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राजीनामा सोपविल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री दलित समाजाचा करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाने केली आहे.
‘महाराष्ट्र राज्यात अनेक हिंदू दलित आहेत. भाजपा पक्ष आणि देवेंद्र फडणवीसजी तुम्ही भारतात आणि महाराष्ट्र राज्यात हिंदुत्वाची संकल्पना मांडत असता आणि हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदू दलितांची मते घेऊन सत्ता मिळवता. फडणवीसजी खरोखरच हिंदू दलितांबद्दल थोडीशी जरी सहानभूती असेल तर आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये हिंदू दलित असेल तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दलित व्यक्तीला बसवावे, जेणेकरून तुम्ही एका जातीचे पुरस्कर्ते नाही हे सिद्ध होईल’, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे.