गुवाहाटी: आसाममध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या सतत पावसामुळे पुराचे पाणी पुन्हा शहरामध्ये घुसले. त्यामुळे अनेकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा, कोपिली आणि बेकी या प्रमुख नद्यांना मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. आतापर्यंत २४.९२ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
वाढत्या पुरामुळे पाण्याने गेल्या २४ तासांत एका लहान मुलासह आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कचार आणि चिरांग जिल्ह्यात एका लहान मुलासह आणखी तीन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सध्या, २,३८९ गावे पुराच्या पाण्याखाली आहेत, राज्यभरातील बाधित जिल्ह्यांमध्ये ८५,६७३ हेक्टरपेक्षा जास्त पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने २३ जिल्ह्यांमध्ये एकूण ६२७ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरू केली आहेत. तिथे सध्या ४५,९१८ मुलांसह १,७६,२०१ लोक राहत आहेत. १४ जिल्ह्यांतील ११.०५ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि कोंबड्यांना महापुराचा फटका बसला आहे.