मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत असून येत्या दोन दिवसात सत्ता स्थापन करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असून येत्या 1 तारखेलाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. परंतु, सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडून बहुमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. महाविकास आघाडी सरकारला उद्या ३० जूनलाच बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीची स्थगिती रोखली. परंतु, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
