मुंबई : एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार उद्या गोव्यातून मुंबईत येणार आहेत. शिंदे गट आणि ठाकरे सरकार यांच्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने सुरु केली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत. कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करु नका. आक्षपार्ह फोटो किंवा बॅनर बाजी करू नका, अशा प्रकारची नोटीस पोलिसांनी भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना दिली आहे. तसेच सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलं असून भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरु आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून निदर्शने सुरु केली आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
