मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र दिलं आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटात देखील हालचाली वाढल्या आहेत. त्यानंतर राज्यपालांनी सकाळी बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. त्यानंतर शिवसेना नेत्यांची तातडीने मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली. ही बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी १८ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.
फडणवीसांनी काल राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र दिलं. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेने मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. आजही मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली. मातोश्रीवरील बैठक संपल्यानंतर सर्वच प्रमुख नेते बाहेर पडले.

बैठकीनंतर शिवसैनिकांकडून मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैठकीवर राऊत म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढची रणनीती ठरवू. आम्हाला न्याय मिळेल. आज संध्याकाळी कॅबिनेटची बैठक आहे. त्याबद्दल मी बोलू शकत नाही. सध्या १८ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. लोकशाहीची हत्या केली जातेय ही जेष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडलेली भूमिका खरी आहे. सुप्रीम कोर्टात ५ वाजता रिट याचिकेवर सुनावणी होईल’