मुंबई : बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूरच्या आगामी ‘शमशेरा’चित्रपटातील ‘जी हुजूर’ हे पहिलं गाणे रीलीज झाले आहे. या गाण्यात रणबीर लहान मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स आणि एनर्जी पाहून तुम्हीही प्रभावित व्हाल. रणबीर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

यशराज फिल्म्सने रीलीज केलेल्या ‘जी हुजूर’ या गाण्यामध्ये रणबीर कपूर हा वरून उडी मारून खाली येतो आणि गाण्याला सुरुवात होते. तिथे लहान मुलं त्याला घेरतात. गाण्यातील सर्व मुलं रणबीरच्या स्टेप्सची कॉपी करताना दिसत आहेत. हे गाणे आदित्य नारायणने शादाब फरीदीसोबत गायले आहे. या गाण्याचे बोल मिथुनने संगीतबद्ध केले असून, मिथुननेच या गाण्याची निर्मिती केली आहे. चिन्नी प्रकाशने या नृत्यदिग्दर्शन केले आहे.
‘जी हुजूर’ रीलीज होताच या गाण्यानं धम्माल उडवून दिली आहे. चाहते या गाण्याचे कौतुक करत आहेत. रीलीज होताच या गाण्याला ज्याप्रकारे जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता हे गाणं चाहते डोक्यावर उचलून धरतील, यात शंकाच नाही, असे बोलले जात आहे. या चित्रपटात रणबीरच्या भूमिकेबद्दल आधीपासूनच जोरदार चर्चा आहे.
शमशेरा या चित्रपटात रणबीर कपूरसोबत संजय दत्त, वाणी कपूर, रोनित रॉय बोस, आणि सौरभ शुक्ला हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट आता २२ जुलै २०२२ रोजी हिंदी ,तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी रणबीर कपूर म्हणाला की, २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी खास आहे. याचवर्षी त्याने आलिया भट्टसोबत लग्न केले. आलिया आणि रणबीर या वर्षी आई-बाबा होणार आहेत. तसेच आलिया सध्या लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चे देखील शूटिंग करत आहे.