मुंबई: महाविकास आघाडी सरकार आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे. उद्या, ३० जुलैला मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. अशात राज्य सरकारकडून सरकार कोसळण्यापुर्वी निर्णयांचा सपाटा लावण्यात आला आहे. मात्र, मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने अद्यापही नवीन निर्णय घेतलेले नाहीत. याबाबत भाजपचे माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. तसेच शासनाने दिलेली आश्वासनं पुर्ण करावीत असं आवाहन त्यांनी महाविकास आघडी सरकारला केलं आहे.
माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी ट्विट केलं की, “गेल्या काही दिवसांत शासनाने अनेक जी आर काढले आहेत. मात्र मराठा आरक्षण व आझाद मैदानावरील उपोषणावेळी समाजाला दिलेली आश्वासने शासनाने विसरू नयेत. शासकीय नोकरीत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या मराठा उमेदवारांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा जी आर देखील काढावा.” असं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढत शासकीय नोकरीत निवड झालेल्या उमेदवारांची कायमस्वरुपी नियुक्ती करावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

दरम्यान, राज्यातील मविआ सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना सरकारकडून अनेक निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. काल मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर शिवसेना आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं असा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मुख्यमंत्री आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मविआ सरकारचं भवितव्य आणखीनच धोक्यात आलं आहे.