मुंबई : बिग बॉसमध्ये दिसलेला मनू पंजाबीला ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. मनू पंजाबीने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केली. चार तासांत १० लाखांची खंडणी मागितली गेली. कोणत्याही प्रकारची हुशारी केली तर सिद्धू मुसेवाला सारखे हाल केले जाईल, असे म्हटल्याचे मनू पंजाबीने ट्विटमध्ये सांगितले आहे.
मनू पंजाबीने ट्विट करून मिळालेल्या धमकीचा उल्लेख केला आहे. तसेच ट्विटमध्ये जयपूर पोलिसांनी सुरक्षा दिल्याबद्दल आणि आरोपींना अटक केल्याबद्दल आभार मानले आहेत. ‘मला एक मेल आला होता. ज्यामध्ये आरोपींनी स्वतःला सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या टोळीतील असल्याचे सांगितले होते. माझ्याकडून १० लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. यामुळे मागचा आठवड्यात तणावात गेल्याचे मनू पंजाबीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

चार तासांच्या आत १० लाख रुपये पाठवावे लागतील. चार तासांत पैसे आले नाहीत तर उलटी गिनती सुरू करा. कारण, यानंतर यमराजसुद्धा वाचवू शकणार नाही. पैसे वेळेवर आले तर आम्ही तुझ्या सुरक्षेची जबाबदारी घेतो. आम्ही तुला कोणत्याही परिस्थितीत काहीही होऊ देणार नाही. थोडीपण हुशारी दाखवली तर तुझ्या शरीरात गोळ्या घालू. यानंतर कुटुंबीयांना आयुष्यभर पश्चात्ताप होईल की १० लाखांसाठी काय गमावले, असेही पत्रात म्हटले आहे.
आमच्यापर्यंत पोहोचण्याचा विचार मनातून काढून टाका. आम्ही जो काही क्रमांक किंवा खाते क्रमांक वापरत आहोत तो आमचा नाही इतकी समज तर असेलच. आम्ही या माणसाला वचन दिले आहे की जर कोणी तुझ्यावर कारवाई केली किंवा तुला बोलावले तर त्याला या जगातून वर पाठवले जाईल. त्यामुळे या खात्यात पैसे टाक आणि यापेक्षा अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू नको. हा तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबीयांसाठी सर्वोत्तम मार्ग आहे, असेही धमकीच्या पत्राच्या शेवटी लिहिले आहे. हे प्रकरण एक आठवडा जुने आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मनू पंजाबीचे हे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय केलेले नाही. जरी मनूचे व्हेरिफाइड इन्स्टाग्राम आणि ट्विटरचे हँडल एकच आहे.