महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि आता पर्यायाने सरकार पडणार, हे स्पष्ट झालं आहे.
यादरम्यान महाविकास आघाडीतही बैठकींचं सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली असून सर्व मंत्री उपस्थित आहेत. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मंत्रीमंडळाची ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते. आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

मागील दोन दिवसांपासून घडामोडी वायूवेगाने पुढे सरकल्या. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात हालचाली होऊ लागल्या. प्रकृती स्थिर होताच यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली. यानंतर महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आकड्यांचं समीकरण साधता न आल्याने शिवसेनेला सत्ता सोडावी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत,अस्लम शेख, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, अशोक चव्हाण, अमित देशमुख, के.सी. पाडवी आणि सुनील केदार पोहोचले आहेत.
बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक होत असून या बैठकीला मंत्रिमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर उद्धव ठाकरे हे बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित असतील. या बैठकीत औरंबादच्या नामांतराबाबत चर्चा होईल असे समजते. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
या प्रस्तावाला काँग्रेसकडून विरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस पाठिंबा देणार नाही, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर काँग्रेसने पाठिंबा काढण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील, अशी चर्चा विधिमंडळ परिसरात रंगली आहे.