लातूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालात यंदा कोकण विभागाने बाजी मारली. तर नाशिक विभाग शेवटच्या स्थानी राहिला. कोरोना संकट असताना देखील अनेक विद्यार्थ्यांनी दहावीत चांगले गुण मिळवले. यामध्ये काही विद्यार्थी असे होते की, ज्यांना सर्व विषयात समान गुण मिळाले. अशातच दोन जुळ्या बहिणींना दहावीच्या परीक्षेत एकसारखेच गुण मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील दोन जुळ्या बहिणींनी सुद्धा समान (प्रत्येकी ८७.६०) गुण मिळवण्याची किमया साधली.
कंधार तालुक्यातील कुरळा गावातील अंकिता आणि निकीता या दोन जुळ्या बहिणी. दोघी दिसण्यामध्ये सारख्या असल्याने गावातीलच नाही तर, घरातील सदस्यही त्यांना ओळखण्यास गोंधळून जायचे. त्यामुळे आईने लहानपणापासून दोघींना वेगवेगळे ठेवले. जुळ्या असून सुद्धा लहानपणापासूनच त्या विभक्त राहिल्या. दहावीची परीक्षा दोघींनी वेगवेगळ्या शाळेतून दिली असली तरी दोघींनी दहावीच्या गुणात जुळवून घेत ८७.६० टक्के गुण मिळविण्याची किमया साधली आहे.
कंधार तालुक्यातील कुरळा येथील भरत श्रीरामे हे चाकूर येथे खासगी नोकरी करतात. त्यांना जुळ्या मुली आहेत. यापैकी निकिता ही आई जवळ राहून येथील भाई किशनराव देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती, तर अंकिता ही गावाकडे आजी-आजोबा जवळ राहून कुरळा गावातील श्री शिवाजी विद्यालयात दहावीला होती. लहानपणापासून दोघी स्वतंत्र राहत होत्या.
दरम्यान, कधीतरी त्यांच्या भेटी होत असत. दोघी एकमेकांच्या संपर्कात राहून अभ्यास करीत होत्या. दहावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा दोघींना समान ८७.६० टक्के गुण मिळाले आहेत. जुळ्या बहिणींनी 15 वर्षे विभक्त राहिल्यानंतर गुणातही जुळवून घेतल्याबद्दल दोघींचे भाई किशनराव देशमुख दहावीच्या परीक्षेतील गुणातही शाळेच्या मुख्याध्यापिक सुनिता कोयले, सहशिक्षिका वर्षा सांगवीकर यांनी अभिनंदन केले.( सौ . साम)