Latest Marathi News

BREAKING NEWS

 

चारित्राच्या संशयावरून महिलेसह दोन मुलांची हत्या!

0 318

कोरेगाव : तालुक्यातील शिरंबे येथे ऊसतोडणी कामगार दत्ता नारायण नामदास याने सोबत राहणाऱ्या योगीता नावाच्या महिलेचे दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गळा दाबून खून केला. त्यानंतर दोन मुलांना दुचाकीवर बसवून जवळच्या शेतात नेऊन विहिरीत ढकलून दिले. ही घटना बुधवारी (दि.१५) रात्री ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्ता नामदास याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होते.

 

 

 

रहिमतपूर पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दत्ता नारायण नामदास हा उस्मानाबाद जिल्ह्यातील राजे बोरगाव येथील रहिवासी आहे. गळीत हंगाम संपल्यानंतर ऊस तोडणाऱ्या टोळीबरोबर मूळ गावी गेला नाही. तो वेलंग शिरंबे येथे राजेंद्र सपकाळ यांच्या घरामध्ये खोली भाड्याने घेऊन योगीता आणि मुले समीर व तनू यांच्यासमवेत राहत होता. योगीता ही त्याची पत्नी नाही; पण दोघे एकमेकांसोबत राहात होते. योगीताचे दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरून दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते.

 

 

बुधवारी रात्री त्याने घरातच योगीता हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मुले समीर व तनू यांना बाहेर जायचे आहे, असा बहाणा करून उठवले व दुचाकीवरून मळ्यातील एका विहिरीवर नेले. अंधारात दोघांना विहिरीत ढकलून दिले. या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोकवस्तीपासून विहीर लांब असल्याने कोणालाही या हत्याकांडाचा सुगावा लागला नाही.

 

 

हा खून केल्यानंतर तो आपल्या मूळ गावी निघून गेला होता. गुरुवार, दि. १६ जून रोजी सायंकाळी खोलीतून वास येऊ लागल्याने सपकाळ यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलीसांना कळविले. पोलिसांनी दत्ता नामदास याच्याबाबतीत चौकशी केली. मात्र, तो दोन दिवस गावात नसल्याचे समजले. त्यानंतर तो मूळ गावी गेल्याच्या संशयावरून माहिती घेतली. त्याला अकलूज येथून ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे.

 

 

पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट देत सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड व उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांना तपासकामी सूचना केल्या. (सौ लोकमत)

 

Leave A Reply

Your email address will not be published.