मुंबई : मुंबईतील वरळीच्या पंचतारांकीत हॉटेलमधील ८ व्या माळ्यावर कौटुंबीक वादाला कंटाळून आईनेच नवजात अर्भकाला कचऱ्याचा डब्यात फेकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करणारी ३४ वर्षीय महिला ही ९ महिन्याची गरोदर होती. हॉटेलमध्ये काम करत असताना अचानक तिला प्रसुती कळा येऊ लागल्या.परंतु , त्याबाबत माहिती हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांना दिली नाही. त्यानंतर महिलेने एका खोलीतच बाळाला जन्म दिला.पण , निर्दयी महिलेने कौटुंबीक वादामुळे आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते नवजात अर्भक हॉटेलच्या कचऱ्याच्या डब्यात फेकून तेथून निघून गेली. त्यानंतर साफ-सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेव्हा कचऱ्याचा डब्यात मुलाचा रडणारा आवाज आला. त्यावेळी त्यांनी नवजात अर्भकाला पाहिले. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी सर्वत्र चौकशी करत ना.म. जोशी मार्ग पोलिसांना पाचरण केले.
दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी ८ व्या माळ्यावरील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याने नवजात अर्भकाला कचरा डब्यात फेकल्याचे दिसून आले. मिळालेल्या पुराव्याचा आधारावरून पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले.
तसेच, महिलेचा शोध घेत तिच्याकडे चौकशी केली असता कौटुंबीक वादातून नवजात अर्भक मुलाचा त्याग केल्याची कबुली पोलिसांनी दिली. ही संबंधित महिला गेल्या अनेक दिवसांपासून पतीपासून विभक्त राहते. या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात महिलेवर भा द वि कलम ३१७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच संबंधित महिलेला लगेच उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.