सोलापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत संभाजीराजेंनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं. आता संभाजीराजे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला चांगलचं धारेवर धरलं आहे. “शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल”? असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना यासंदर्भात संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झालंय असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीच्या मुद्द्याला अप्रत्यक्षपणे हात घातला. यावेळी भाजपावर देखील त्यांनी निशाणा साधला. “महाविकास आघाडी सरकारने काही निर्णय घेतला तर त्याला टीका करायलाच पाहिजे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. यातून त्यांना कोणता आसूरी आनंद मिळतो ते माहीत नाही. मनं शुद्ध नसली की लोकं असा आसुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
इतकंच नाही तर, या मुद्द्यावरून टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचाही राऊतांनी समाचार घेतला आहे. “चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी 2019 ला आम्हाला दिलेला शब्द मोडल्याबद्दल आधी खुलासा करावा. तेव्हा कुणी शब्द दिला होता आणि कुणी मोडला? हा संभाजीराजे आणि आमच्यातला विषय आहे. इतरांनी चोमडेपणा करू नये. असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.