नवी दिल्ली: माणसाच्या शरीरात दोन किडनी असतात. यातील एक किडनी निकामी झाल्यानंतरही माणूस दुसऱ्या किडनीच्या आधारे जिवंत राहू शकतो. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अफगाणिस्थानमध्ये असे एक गाव आहे जिथे अनेक गावकऱ्यांना एक किडनी नाही. म्हणजेच येथील खूप लोक दोन नाही तर एका किडनीच्या साहायाने आपले जीवन जगत आहेत. या गावात अशी शेकडो माणसे आहेत.
एका इन्टरनेट वाहिनीच्या वृत्तानुसार, अफगाणिस्थानच्या हेरात शहराजवळ एक गाव आहे. या गावाचे नाव आहे शेनशायबा बाजार. जगभरात हे गाव ‘एक किडनी असलेले गाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. वास्तविक, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपली एक किडनी विकावी लागत आहे.
अफगाणिस्थानातील या गावातले लोक गरिबीमुळे त्यांना आपले अवयव विकावे लागत आहेत. तालिबानी राजवट आल्यामुळे येथील नागरिकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. येथील बहुतांश लोकांनी आपल्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी आपल्या शरीराची एक किडनी विकली आहे.
आपली किडनी विकण्यासाठी या लोकांना पैसे मिळतात. या पैशांनी ते आपल्या कुटुंबाचे पोट भारतात. या लोकांसाठी काळ्या बाजारात आपले अवयव विकणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. या गावातील खूप स्त्री-पुरुषांनी आपली एक किडनी विकली आहे. येथे एक किडनी सुमारे २ लाख रुपयांना विकली जाते. अफगाणिस्तानच्या चलनात ते अडीच लाख रुपये आहेत.