रशियाने ऑफर केलेल्या सवलतीच्या दरात भारतीय तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ३० लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. रशियाकडून अद्याप युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. याच दरम्यान, भारतातील मोठ्या तेल कंपनीने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली आहे. IOC ने मे डिलिव्हरीसाठी कच्चे तेल प्रति बॅरल २०-२५ डॉलरच्या सवलतीने खरेदी केले असल्याची माहिती दिली आहे.
अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यामुळे, रशियाने भारत आणि इतर मोठ्या खरेदीदार देशांना सवलतीच्या दरात तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. भारत हा मोठा तेल आयातदार देश असून एकूण देशांतर्गत गरजेच्या ८५ टक्के तेलाची आयात केली जाते. तेलाची गरज लक्षात घेता भारत स्वस्त दरात कुठूनही तेलाची खरेदी करून ऊर्जा बिलात कपात करू पाहत आहे.